प्रभात वृत्तसेवा पिंपरी – कौटुंबिक वादातून एका महिलेवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास भोसरीतील गणेशनगर धावडे वस्ती परिसरात घडली.संतोष महादेव आव्हाड (वय २७) व त्याची पत्नी रंगुबाई संतोष आव्हाड (वय २५, दोघेही रा. गणेशनगर धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रावसाहेब शिवराम आव्हाड (वय ३०, रा. सोमनाथ लांडगे यांची मोकळी जागा, गणेशनगर, भोसरी, पुणे) यांनी शनिवारी (दि. ११) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनाली रावसाहेब आव्हाड असे भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावसाहेब आव्हाड यांनी त्यांचा चुलत भाऊ संतोष आव्हाड याला हातउसने पैसे दिले होते. ते पैसे फिर्यादी यांनी परत मागितले. या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातून आरोपी संतोष व त्याची पत्नी रंगुबाई यांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी संतोषने “तुला आणि तुझ्या बायकोला जिवंत जाळतो” असे म्हणत बाटलीतील पेट्रोल फिर्यादीच्या पत्नीवर ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत सोनाली या गंभीर जखमी झाल्या आहेत. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.