प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याच्या ध्येयाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यात तीन कुख्यात टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करत २१ सराईत गुन्हेगारांना तुरूंगात पाठविले आहे.या कारवाईत सुरज पवार टोळी (पिरंगुट), सुनिल ठाकूर टोळी (थेरगाव) आणि नितीन शिंदे टोळी (चाकण) यांचा समावेश असून या टोळ्यांच्या प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या टोळ्यांवर खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणी, बलात्कार, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, वाहन जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.बावधन पोलीस ठाण्यातील खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात सूरज ऊर्फ सोन्या पवार व १२ साथीदारांवर सात गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. तर काळेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह सुनिल ऊर्फ शेट्टी ठाकूर व तीन साथीदारांवर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात नितीन शिंदे व तीन साथीदारांवर कारवाई केली असून या टोळीवर सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत.या टोळ्यांनी बावधन, काळेवाडी, सांगवी, वाकड, हिंजवडी, महाळुंगे, चाकण तसेच पुणे ग्रामीण व इतर ठिकाणी दहशत माजवून गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. हिंसाचाराच्या धमक्या देऊन व धाक दाखवून अवैध आर्थिक फायदा मिळवण्याचे त्यांच्या टोळ्यांचे उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. नऊ महिन्यांत ३१ टोळ्यांवर कारवाई.. सन २०२५ मध्ये आतापर्यंत ३१ संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील तब्बल १६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. मोकाचेआदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिले असून मोका अंतर्गत कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे गुन्हेगारीवरचे नियंत्रण अधिक प्रभावी झाल्याचे मानले जात आहे.