प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ड्राय डे असताना आणि दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह मॅनेजर आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. २) रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी, साखरेवस्ती येथील हॉटेल बॉटम्सअप येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित शिंदे यांनी रविवारी (दि. २) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालक परशुराम मोनाप्पा धामनेकर (वय ४८, रा. निगडी), मॅनेजर हनुमंत सायबा कांबळे (वय ३७, रा. साखरेवस्ती, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) आणि जागा मालक पंकज विजय साखरे व शुभम विजय साखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक तसेच मॅनेजर यांनी ‘ड्राय डे’ असताना आणि दारू विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल बॉटम्सअपमध्ये ४४ हजार ८६५ रुपये किमतीची दारू विक्री करताना ते आढळून आले. तसेच, हॉटेल मालकाकडे दारू विक्रीचा वैध परवाना नाही हे माहित असताना देखील जागा मालक आरोपींनी त्यांची जागा हॉटेल चालवण्यासाठी आणि दारू विक्रीसाठी भाड्याने उपलब्ध करून दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.