Pimpri Crime : दांडियाच्या गर्दीत कोयता गँगची दहशत ; अल्पवयीन मुलावर केला कोयत्याने वार

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. २५) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.नरजीम शेख, विशाल गालफाडे, यश गायकवाड, सिद्धार्थ गालफाडे, यश रोकडे, एक विधी संघर्षित बालक आणि त्यांच्या सोबत असलेल १२ ते १४ साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील वाल्मिकी चौक व भाजी मंडई पार्किंग येथे दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला केला. या दरम्यान आरोपींनी त्याला मारहाण करत कोयता व लोखंडी रॉडने गंभीर जखमी केले.
फिर्यादीच्या आरडाओरडीनंतर जमलेल्या नागरिकांना आरोपींनी हवेत कोयते फिरवून दहशत माजवत “आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.




