प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दुचाकीला रिक्षाचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून रिक्षाचालकावर कोयता व दांडक्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना चाकण येथील नाणेकरवाडी गावातील दांडिया कार्यक्रमादरम्यान गुरुवारी (दि. २) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.ओम चालू नाणेकर व रजत येरकर (दोघेही रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीकांत तुकाराम शिंदे (वय २९, रा. गोकुळ सोसायटी, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास तुकाराम शिंदे आणि त्याचा मित्र अविनाश हे श्रीराम नवरात्र मित्र मंडळाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना आरोपी मोटारसायकलवर ट्रीपलसीट बसून आले. रिक्षाला धक्का लागल्यावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी कोयता व दांडक्याने शिंदे व त्याच्या मित्रावर हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.