प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून मिरची पावडर, दोन कोयते आणि चार दुचाकी वाहनांसह एकूण २ लाख ३९ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री निशिगंधा अपार्टमेंट समोर, जुनी सांगवी येथे करण्यात आली.संतोष मुक्काप्पा पवार (वय ३०, रा. बाणेर), पियुष आनंद राजपुत (वय १८, रा. औंध), तेजस मनोहर हंसकर (वय १९, रा. जुनी सांगवी), आलोक सुर्यकांत खेत्रे (रा. औंध), अमोल संजय भोसले (वय २४, रा. जुनी सांगवी), विराज अधिकराव काटे (वय २०, रा. औंध) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गुड्डया ऊर्फ आर्यन मोरे (रा. जुनी सांगवी) आणि शायद शेख (रा. औंध) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास माळवी यांनी गुरुवारी (दि. २५) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून जुनी सांगवी येथील एका दुकानावर दरोडा टाकण्याची तयारी करून आले होते. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून दरोडेखोरांचा डाव उधळला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार पळून गेले. आरोपींच्या ताब्यात २५ रुपये किमतीची मिरची पावडर, ६० हजार रुपये किमतीची होंडा शाईन, ४० हजार रुपये किमतीची मोपेडे (एमएच १२/डीओ ५२५०), ३५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी, ७० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी (एमएच १२/युवाय ५२५०), २०० रुपये किमतीचे ४ कोयते आणि ३४ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल असा एकूण २ लाख ३९ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.