प्रभात वृत्तसेवा पिंपरी – बुल मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची एक कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी कोल्हापूर येथील दोघांना अटक केली.अक्रम शमशुद्दीन शेख (वय ३३), विनय सत्यनारायण राठी (वय ३४, दोघेही कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव येथील तक्रारदार गुगलवर गुंतवणुकीबाबत माहिती घेत असताना त्यांना बुलमार्केट बाबत माहिती मिळाली. दरम्यान इंग्लंड येथील क्रमांकावरून त्यांना अज्ञातांचे फोन आले. आरोपींनी बुल मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नऊ लाख ८४ हजार ५५४ रुपये आणि एक कोटी ४४ लाख ७२ हजार रुपये किमतीचे दोन बिटकॉइन घेत त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोल्हापूर येथील आरोपी निष्पन्न केले. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपी अक्रम आणि विनय हे कारने मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाक्यावर त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी अक्रम हा वेगवेगळे बँक अकाउंट प्राप्त करत होता. तर विनय हा सिमकार्ड कंपनीत नोकरी करत होता. तिथे तो संबंधित बँक खाते ऑनलाइन अपडेट ते मुमबी येथील विराज जोशी नावाच्या व्यक्तीला सायबर फसवणुकीसाठी देत होते. आरोपी दुबई येथील एका व्यक्तीच्या संपर्कात राहून हे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.