प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रहाटणी परिसरात मध्यरात्री अज्ञात कारणावरून रिक्षा आणि चार दुचाकींना पेटवून देण्याचा प्रकार घडला. स्वामी समर्थ कॉलनीत घडलेल्या या घटनेत सीसीटीव्हीत आरोपीचा स्पष्ट सहभाग दिसून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुरू असतानाही जाळपोळीची घटना घडल्याने, गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे.अभिषेक राजाराम श्रीनामे (वय २२, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भगवान अशोक घनाते (वय ५३, धंदा–रिक्षाचालक, रा. रहाटणी) यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबासह तुळजापूर देवदर्शनावरून परत आल्यावर घरासमोर पार्क केलेली रिक्षा आणि दुचाकींना मध्यरात्री आग लावण्यात आली. नागरिक व अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत चार दुचाकी आणि रिक्षा आगीत खाक झाल्या. सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अभिषेक श्रीनामे हा पेट्रोल ओतून वाहने पेटवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. किरकोळ वाद, वैयक्तिक राग अथवा दहशत निर्माण करण्याचा हेतू-यापैकी नक्की काय कारण होते, याचा तपास सुरू आहे. मात्र साध्या घरगुती वादातून सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेली वाहने जाळण्याइतका अतिरेक केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. नववर्ष स्वागतावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे सांगितले जात असतानाच वाहनांची जाळपोळ झाल्याची घटना नोंदवली गेली आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात होते. त्यांनी यापूर्वीच पोलिसांना सांगितले होते की “तोडफोड व जाळपोळ खपवून घेतली जाणार नाही.” असा इशारा दिल्यानंतर शहरात अशा घटना घडत असल्याने ही बाब पोलिसांच्या सज्जतेवर थेट बोट ठेवणारी ठरली आहे.शहरात आधीच तडीपार गुंडांचा वावर वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच जाळपोळीचे प्रकार घडत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश आहे का नाही? हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “बंदोबस्त कागदावर, गुन्हेगार रस्त्यावर!”. रात्रीच्या वेळी वाहनांची जाळपोळ ही केवळ मालमत्तेची हानी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेवरचा थेट हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहरात सलग घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या गस्त, निगराणी आणि प्रतिबंधात्मक कारवाईची परिणामकारकता तपासणीच्या विळख्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांकडून तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.