Pimpri Crime | वाकडमध्ये रोडवरच ‘ड्रग्ज ’ पावडर पकडली! ; दोन तरुणांना अटक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – वाकड येथे दोन व्यक्तींना बेकायदेशीररित्या एमडी (मेफेड्रोन) पावडर बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (23 सप्टेंबर) दुपारी वाकड येथील रोलेक्स रोड, पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर करण्यात आली.प्रविण (वय 21, रा. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) आणि जमीर खान (वय 32, रा. थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गवारी यांनी मंगळवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याच्याकडे एक लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीची 11.84 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आणि पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन सापडला. तसेच, आरोपी जमीर खान याच्याकडे 84 हजार 190 रुपये किमतीची 9.14 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आणि 20 हजार रुपये किमतीच एक मोबाईल फोन आढळला. दोन्ही आरोपींनी संगनमत करून एमडी (मेफेड्रोन) पावडर बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगल्याचे निष्पन्न झाले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




