प्रभात वृत्तसेवा पिंपरी – कौटुंबिक न्यायालयात सुरु असलेली केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासऱ्याच्या घरात जाऊन मारहाण केली. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री वाकड येथे घडली.याप्रकरणी स्वामीराव बप्पाजी जगताप (वय ६८, रा. वाकड) यांनी शनिवारी (दि. २७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदेश पुंडलीक जाधव (वय ४०, रा. ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपी जावई संदेश जाधव याने फिर्यादीची परवानगी न घेता घरात प्रवेश केला. त्याने “सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयातील केस का माघार घेत नाही, बायकोला नांदायला का पाठवत नाही, घटस्फोटाच्या पेपरवर सही का करत नाही,” असे म्हणत फिर्यादीला पेनच्या लाकडी स्टँडने आणि हातातील कड्याने डोक्यात मारून दुखापत केली. तसेच, त्याने फिर्यादी यांची मुलगी अर्चना हिला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत धमकी दिली आणि तिच्या मोबाइल फोनचे नुकसान केले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.