Pimpri Crime | टोईंगवरून वाद! तरुणाचा हेल्परवर हल्ला, जीवे मारण्याची धमकी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – वाहन टो केल्याच्या रागातून एका तरुणाने टोईंग हेल्परला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारी बावधन वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर सुस खिंड येथे घडली.टोईंग हेल्पर अंशु सचिन शेलार (वय २२, रा. कोंढवा, पुणे) यांनी शनिवारी (दि. २०) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरफात सिफातुल्ला फारुकी (वय २१, रा. लवळे, ता. मुळशी, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बावधन वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅनवर टोईंग हेल्पर म्हणून काम करतात. शुक्रवारी त्यांच्या पथकाने काही वाहने टो केली. ती वाहने बावधन वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर आणली. त्यावेळी आरोपी फारुकी तिथे आला. त्याने फिर्यादी शेलार यांना गाडी टो का केली, असे विचारत धमकी दिली. तसेच दगडाने हातावर मारून शेलार यांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.




