Pimpri Crime | झोपलेल्या टेम्पो चालकावर हल्ला ; मी इथला भाई आहे म्हणत केली मारहाण

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – टेम्पो चालकाला मारहाण करून त्याला लुटले. तसेच आरोपींनी टेम्पो ट्रॅव्हलरची काचही फोडली. ही घटना शुक्रवारी (दि. १२) पहाटे साडेबाराच्या सुमारास जनता सहकारी बँकेसमोर, जुना जकातनाका, चिंचवड येथे पुलाखाली घडली.प्रकाश नागनाथ मिसाळ (वय ५५, रा. वाकड) यांनी शुक्रवारी (दि. १२) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार माऊली दिनेश शिंदे, आदित्य किशोर आरणे, आणि रोशन खंडु बल्लाळ (सर्व रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी माऊली शिंदे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा टेम्पो पार्क करून गाडीच्या मागील बाजूला झोपले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी टेम्पोत येऊन त्यांना खाली ओढले.
आरोपी माऊली शिंदे याने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशात हात घालून १,२०० रुपये रोख काढून घेतले आणि आणखी पैसे आहेत का असे विचारले. तिघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. माऊलीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून त्यांना जखमी केले.
फिर्यादीने मदतीसाठी ओरडल्यावर आरोपी माऊली चिडून ‘मी इथला भाई आहे, तू मला ओळखत नाहीस का’ असे म्हणाला. त्यानंतर त्याने लाकडी दांडके आदित्य आरणे याच्या हातात देऊन टेम्पो ट्रॅव्हलरची काच फोडण्यास सांगितले. आदित्यने टेम्पो ट्रॅव्हलरच्या काचा फोडल्या आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




