प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पोलिसांनी बंद केलेला स्पीकर पुन्हा सुरू का केला, अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या होमगार्डच्या तोंडावर ठोसा मारून त्याचे दोन दात पाडले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना भोसरी येथील महात्मा फुलेनगरमध्ये २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडली.सोहेल कादर शेख (वय १९, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर तुकाराम पाटील (वय २९, रा. सिताराम अपार्टमेंट कॉलनी नं. १, दिघी) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसोबा प्रतिष्ठान मंडळाचा स्पीकर मोठ्या आवाजात वाजत असल्याने तो बंद करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निलेश तळेकर हे गेले होते. स्पीकर बंद करायला लावून ते गेलेअसता मंडळाने पुन्हा मोठ्या आवाजात स्पीकर लावला. त्यामुळे होमगार्ड मयुर पाटील हे याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपी शेख याने फिर्यादी पाटील यांचे कॉलर पकडून शिवीगाळ केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. यात पाटील यांचे दोन दात तुटले आहेत.