प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मुळशी तालुक्यातील माण येथील मल्हार पार्कमधील फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात ४९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ फेब्रुवारी २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली.पोलिसांनी एका महिलेसह दिपक रमेश मोरे, जितेंद्र रमेश मोरे (सर्व रा. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आदर्श नगर, नवी सांगवी येथे राहणा-या ५१ वर्षीय महिलेने शनिवारी (दि.१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फ्लॅट विकण्याचे सांगून ४९ लाख २१ रुपये फिर्यादी आणि साक्षीदार प्रतिक्षा सुभाष वाघ यांच्याकडून घेतले, मात्र मालमत्ता न देता पैशाचा अपहार केला. त्यानंतर समजुतीचा करार करून पोस्ट डेटेड चेक दिला, पण जाणूनबुजून खात्यात पैसे न ठेवता चेक बाऊन्स केला. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.