Pimpri : विधानपरिषदेकरिता शहर राष्ट्रवादी आग्रही

पिंपरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 27 मार्चला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. यात भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र या निवडणुकीआधी अजित पवारांची डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले आहेत.
यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून माजी महापौर योगेश बहल व माजी नगरसेवक नाना काटे यांचादेखील समावेश आहे. उल्लेखनीय बाब अशी की, पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांचे चिरंजीव विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहरातील पदाधिकाऱ्यांना विधानपरिषद अथवा महामंडळावर घेण्याची गरज असल्याचे बोलून दाखविले होते. ते शब्द खरे ठरणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. सत्तेच्या सारीपाटात विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे नाना काटे हे बंड करण्याच्या मन:स्थितीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत, त्यांना भाजप उमेदवार शंकर जगताप हे अडचणीत येऊ नयेत, याकरिता बंड करण्यापासून परावृत्त केले होते. तर माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल हेदेखील इच्छुक होते.
विधानसभा निवडणुकीवेळी शंकर जगताप यांच्या उमेदवारीसाठी नाना काटे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केली होती. आता हे दोन्ही इच्छुक विधानपरिषदेकरिता आग्रही असल्याचे दिसून येत आहे. तर आमदार शंकर जगताप ही माझ्यासाठी शब्द टाकतील आणि विधानसभेची परतफेड करतील अशी अपेक्षा ही काटेंनी बोलून दाखविली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वयकाची भूमिका बजावणारे माजी महापौर योगेश बहल यांनीदेखील विधानपरिषद सदस्यपदावर दावा केला आहे. दरम्यान,राष्ट्रवादीकडे 100 पेक्षा अधिक पदाधिकारी इच्छूक असून, राष्ट्रवादीच्या मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत अन्य पदाधिकार्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.
पक्षाला बळ देण्यासाठी
महापालिका निवडणुका होणार असल्याने पक्षाला शहरात बळ देणे गरजेचे आहे. भाजपने शहरातील दोन नेत्यांना विधानपरिषदेवर संधी दिली आहे. यामुळे शहरात सध्या भाजपचे चार आमदार आहेत. राष्ट्रवादीने देखील विधानपरिषद आणि महामंडळांच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकाऱ्यांना बळ द्यावे, अशी मागणी कार्यकत्र्यांमधून होत आहे.





