पिंपरी, – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरवासीयांचे जीवन सुखकर होण्यासाठी प्रशस्त रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची वेगळी ओळख राज्यात होती. उड्डाणपूल आणि प्रशस्त रस्त्यांसाठी एकेकाळी शहराचा नामोल्लेख होत होता. परंतु या प्रशस्त रस्त्यांना अनधिकृत पार्किंगचे ग्रहण लागले आहे. शहरातील महत्त्वाचे रहदारीचे मार्ग आणि चौकांमध्ये अनधिकृत पार्किंग दिसून येत आहे. परंतु वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरातील बहुतांश सर्व रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगचे पेव फुटले आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु अद्याप महापालिका प्रशासन व वाहतूक विभाग अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करताना दिसून येत नाही.
महापालिकेच्या वतीने शहरात विस्तृत रस्ते व पदपथ निर्माण केले आहेत. हे नागरिकांच्या सोयीसाठी केले असले तरी या पदपथांवर व रस्त्यांवर अनधिकृत वाहन पार्किंग आणि व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे रस्ते वाहतूक धोकादायक ठरत असून, काहींना यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर होत असलेले अतिक्रमण व अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील स्पाइन रोड, निगडी-भोसरी मार्ग, आकुर्डी-चिखली मार्ग, थरमॅक्स चौक परिसर, पिंपरी-चिखली मार्ग, देहू-आळंदी मार्गावर तसेच भोसरीतील काही रस्त्यांवर अवजड वाहतूक करणारी वाहने आणि चार चाकी गाड्या अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क केल्या जात आहेत. काही वाहनचालकांनी तर आपली स्वतःची पार्किंगची जागा असल्याप्रमाणे दररोज रात्री व सकाळी त्या ठिकाणी गाड्या पार्क करत आहेत.
स्पाइन रोडवर पवार वस्ती येथे सर्व्हिस रोडला मागील काही महिन्यांपासून अवजड वाहने पार्क करण्याचे अनधिकृत स्थानक झाले आहे. याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने येथील रस्ता रहदारीसाठी अरुंद झाला आहे. घरकुल चौकातून भोसरीकडे जाताना चिखली, कुदळवाडी, पवार वस्ती येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून सर्व्हिस रस्त्याला जाण्यासाठी तयार केलेल्या रस्त्याच्या सुरुवातीलाच अवजड वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याने मागून व पुढील बाजूने कोणते वाहन येत आहे की नाही याचा अंदाज न आल्याने येथे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. पवार वस्ती येथील सर्व्हिस रस्त्याला आतापर्यंत अनेक अपघात घडले असून काहींना आपला जीव गमावावा लागला आहे.
शरदनगरमध्ये वाहनांची रांग
स्पाइन रोडला शरदनगरभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अवजड वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. हनुमान मंदिराच्या जवळ स्पाइन रोडवरून सर्व्हिस रस्त्याला जाण्यासाठी रस्ता दुभाजक खुला केला आहे. परंतु येथे कंपनीच्या कामगारांना ये-जा करण्यासाठी असलेल्या गाड्या पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरून येणारी वाहने दिसून येत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे येथील अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
व्यावसायिकांचे अतिक्रमण
स्पाइन रोडला काही चारचाकी व अवजड वाहने दुरुस्त करण्यासाठी गॅरेज आहेत. तेथे येणारी वाहने रस्त्यातच पार्क केली जात आहेत. बरेच गॅरेजवाले रस्त्यातच वाहने रिपेअर करत आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होत असून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना वाहतूक विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्पाइन रोडला अवजड वाहने पार्क करण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकी, चार चाकी वाहनचालकांना लक्षात न आल्याने अपघात घडत आहेत. स्पाइन रोड रहदारीचा मार्ग असल्याने अनधिकृतपणे वाहन पार्किंग करणार्यांवर कारवाई करावी.
– राहुल भोसले, शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक.