Pimpri Chinchwad Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा! मुसळधार पावसाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
Pimpri Chinchwad Traffic: सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने शहरातील प्रमुख चौक जाम; रावेत, मुकाई चौक आणि ताथवडे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा.

Pimpri Chinchwad Traffic – सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला. यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. रावेत, ताथवडे, मुकाई चौक, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल तसेच हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनचालकांना अक्षरशः रांगत प्रवास करावा लागला.
प्रत्येक पावसाळ्यात शहराची हीच अवस्था होत असताना प्रशासन मात्र कायमप्रमाणे हातावर हात धरून बसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने वाहनांचा वेग कमी झाला. त्यातच पावसापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी चारचाकी वाहनांना प्राधान्य दिल्याने रस्त्यांवरील वाहनसंख्या अचानक वाढली. परिणामी शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला.
चारचाकी, दुचाकी, पीएमपीएमएल बस आणि मालवाहू वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. मात्र या कोंडीमागे केवळ पाऊस कारणीभूत नसून प्रशासनाची निष्क्रियता तितकीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था आधीपासूनच दयनीय असून त्यावर पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसेनासे झाले. अनेक वाहने रस्त्यातच बंद पडल्याने वाहतुकीची परिस्थिती आणखी गंभीर बनली.
अनेक ठिकाणी वाहतूक पोलीसच नसल्याचे चित्र दिसल्याने वाहनचालकांना स्वतःच वाहतूक नियंत्रित करण्याची वेळ आली. स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांना खड्डे, पाणी साचलेले रस्ते आणि तासन्तास वाहतूक कोंडीचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
“सध्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्यामुळे वाहतूक शाखेच्या मनुष्यबळावर काही प्रमाणात ताण आला आहे. तरीही पुनावळे आणि मुकाई चौक परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.”
– बापूसाहेब ढेरे, पोलीस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
“खासगी वाहनांचा वाढता वापर ही कोंडीची प्रमुख कारणांपैकी एक आहे. नागरिकांनी शक्य तितका सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिल्यास वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकतो.”
– सचिन सिद्धे, स्थानिक नागरिक






