Pimpri-Chinchwad: डीजेचा दणदणाट की धोक्याची घंटा? हृदयविकार, कानांचे विकार आणि अस्वस्थतेचा धोका
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये कडक नियंत्रणाची गरज

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराच्या उपनगर परिसरात आता विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरू झाली आहे. मिरवणुका म्हणजे जल्लोषाचा क्षण. मात्र, या जल्लोषाला कर्णकर्कश डीजेच्या आवाजाची जोड मिळत आहे. यंदा पोलिसांनी कडक भूमिका स्वीकारली असून डीजेवर कारवाई होणारच असे ठणकावून सांगितले आहे. तरीदेखील डीजेचा दणदणाट उपनगरांमध्ये घुमण्याची भीती व्यक्त होत आहे.
आवाजाची मर्यादा ओलांडून होणारा दणदणाट नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. काही घटनांमध्ये अतितीव्र आवाज आणि मिरवणुकीतील नाचण्यामुळे तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आवाजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
डीजेच्या भिंती हादरवणाऱ्या आवाजामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रुग्णांच्या अडचणी वाढतात. सततच्या मोठ्या आवाजामुळे तणाव, डोकेदुखी आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मिरवणुकीत डीजेचा आवाज वाढविण्याची स्पर्धाही अनेकदा पाहायला मिळते. दोन मंडळे किंवा डीजे चालकांमध्ये कोणाचा आवाज अधिक मोठा, अशी जणू स्पर्धाच सुरू होते. त्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त आवाजात साउंड सिस्टिम वाजविली जाते. यामुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर बनते.
आरोग्यावर थेट परिणाम
मोठ्या आवाजाचा सर्वाधिक परिणाम कानांवर होतो. दीर्घकाळ तीव्र आवाजाच्या संपर्कात राहिल्यास श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. कानात सतत आवाज येणे, चक्कर येणे आणि डोकेदुखी यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. अतितीव्र आवाजामुळे शरीरात तणाव निर्माण होतो. रक्तदाब वाढू शकतो. हृदयाचे ठोके वाढू शकतात. हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो.
मिरवणुकांतील घटनांनी चिंता वाढली
मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास झाल्याच्या घटना विविध भागांत यापूर्वीही समोर आल्या आहेत. हिंजवडी आणि सांगली परिसरातील विसर्जन मिरवणुकांमध्ये तरुणांच्या मृत्यूच्या घटना चर्चेत आल्या होत्या. सोलापूरमध्ये मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
हिंगोलीतही डीजेच्या आवाजाच्या स्पर्धेदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनांची कारणे प्रत्येक प्रकरणात वेगवेगळी असू शकतात. मात्र, मिरवणुकीतील अतितीव्र आवाज आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही.
नियम आहेत; अंमलबजावणी कुठे?
पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सव, नवरात्र, विसर्जन आणि अन्य सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. शहरातील विविध भागांत डीजे आणि ध्वनिवर्धकांचा वापर केला जातो. विहित ध्वनिमर्यादा पाळली जाते का, यावर प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तपणे ध्वनिमर्यादेची तपासणी करावी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी. मिरवणुकीपूर्वीच मंडळांना स्पष्ट सूचना द्याव्यात. ध्वनिमापनासाठी पथके नियुक्त करावीत. सणाचा आनंद अबाधित राहावा. मात्र, तो इतरांच्या आरोग्याच्या किंमतीवर नको. उत्सवातील जल्लोषाला मर्यादेची जोड मिळाली, तरच सण खऱ्या अर्थाने आनंददायी ठरेल.
‘डीजेच्या मोठ्या आवाजामुळे कानाचा आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. शक्यतो अशा आवाजापासून दूर राहणे केव्हाही चांगले. जर शक्य नसेल तर बाजारात मिळणारे एअर प्लग कानात घालावे. त्यामुळे आवाजाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.’ – डॉ. विनायक पाटील, भोसरी रुग्णालय
Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य





