Talegaon Dabhade : तळेगावात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
Talegaon Dabhade : उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे महावितरणला निवेदन

तळेगाव दाभाडे – शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा नियमित आणि सुरळीत करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
शहरात दिवसभर वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने घरगुती कामांसह व्यावसायिक व्यवहार आणि कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. अनेकदा पूर्वसूचना न देता वीज खंडित होत असल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्याच्या वेळेबाबत नागरिकांना निश्चित माहिती मिळत नाही.
कामगार, लघुउद्योजक, दुकानदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाइन शिक्षण, संगणकीय कामे आणि व्यापारी व्यवहारही विस्कळीत होत आहेत. वारंवारवीज खंडित झाल्याने विद्युत उपकरणे बिघडण्याच्या समस्याही उद्भवत आहेत.
वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे काही भागांत पाणीपुरवठा उशिरा होणे किंवा बंद राहण्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे महावितरणने तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी काकडे यांनी केली आहे. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Baramati : २० हजार मतदारांना १४ कोटींचे वाटप; पुरुषोत्तम जगताप यांचा गंभीर आरोप!





