Pimpri Chinchwad Police : पोलिसांची मोठी कारवाई! एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Pimpri Chinchwad Police : देशी-विदेशी दारूची वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा शहरात धडाका; रविवारी १६ ठिकाणी मोठी कारवाई.

Pimpri Chinchwad Police – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देशी, विदेशी दारूची वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी शहराच्या विविध भागांमध्ये १६ कारवाया केल्या. यामध्ये एक लाख ७९ हजार ४७० रुपयांची देशी दारू, ११ लाख ५७ हजार ६९५ रुपयांची विदेशी दारू आणि १५ लाख रुपये किमतीची सात वाहने जप्त केली आहेत. चिंचवड, संत तुकाराम नगर, चाकण, निगडी, सांगवी, पिंपरी, महाळुंगे, काळेवाडी, हिंजवडी परिसरात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. ७ जून) १६ कारवाया केल्या.
चिंचवड, चाकण, संत तुकाराम नगर, निगडी, सांगवी येथील कारवायांमध्ये दारूची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी एक कार, एक पिकअप, एक रिक्षा आणि चार दुचाकी अशी एकूण १५ लाख रुपये किमतीची सात वाहने जप्त केली. महाळुंगे, चाकण, चिंचवड, चिखली, काळेवाडी आणि हिंजवडी येथे देशी दारूची विक्री केली जात होती. खबऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारत देशी दारू मोठ्या प्रमाणात जप्त केली.
संत तुकाराम नगर येथे आलिशान कार मधून विदेशी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ८६ हजारांची विदेशी दारू आणि १२ लाख रुपये किमतीची कार जप्त केली. चिंचवड, सांगवी, पिंपरी, निगडी येथे दुचाकीवरून दारू नेत असताना चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ९० हजारांची दारू जप्त केली. सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल २८ लाख ३७ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.





