Pimpri Chinchwad Police : पोलीस आयुक्तांच्या भेटीच्या वेळेत मोठा बदल; सोमवारपासून ‘हा’ असेल नवीन नियम
Pimpri Chinchwad Police : नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद होणार अधिक सुलभ; प्रलंबित प्रश्नांच्या तत्काळ निकालासाठी आयुक्तांचा पुढाकार.

Pimpri Chinchwad Police – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेल्या पोलीस आयुक्तांची भेट या उपक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता नागरिकांना दर सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेतच आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत. हा बदल सोमवार (दि. ४) पासून लागू होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आली.
यापूर्वी हा उपक्रम दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत राबविला जात होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव वेळेत एक तासाने बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नवीन वेळेची नोंद घेऊन त्यानुसार आयुक्तालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना थेट पोलीस आयुक्तांना भेटून आपल्या तक्रारी, समस्या तसेच सूचना मांडण्याची संधी मिळते.
अनेक प्रलंबित प्रश्नांवर तत्काळ निर्णय होण्यास या संवादाचा फायदा होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे हा उपक्रम शहरात प्रभावी ठरत आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत आहे. बदललेल्या वेळेनुसार अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जनसंपर्क विभागाने केले आहे.




