PCMC Water Supply – मावळ तालुक्यातील आंद्रा धरणाच्या वरील भागात जॅकवेल उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेस ९५ गुंठे जागा जलसंपदा विभागाने मंजूर केली आहे. त्यासाठी महापालिका २ कोटी ३ लाख रूपये अदा करणार आहे. जागेचा मुख्य प्रश्न सुटल्याने आता महापालिकेने जॅकवेलसह भूमिगत जलवाहिनीच्या कामाची निविदा काढता येणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेस शुद्ध पाणी मिळणार आहे. महापालिकेस आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी राखीव आहे. मात्र, प्रकल्प पूर्ण होईपर्यत तळवडेजवळील निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधार्यातून तात्पुरत्या स्वरूपात महापालिका तेथून ९५ एमएलडी पाणी दररोज उचलत आहे. इंद्रायणी नदीकाठावरील गावांचे मैलासांडपाणी थेट नदीत सोडले जात आहेत. तसेच, उद्योगांचे रासायनिक सांडपाणीही थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी अधिक दूषित आहे. त्या पाण्यावर चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. अतिदूषित पाणी असल्याने ते शुद्ध करण्यासाठी महापालिकेत अधिकचा खर्च येत आहे. पाण्यास हिवरट रंगासह दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आंद्रा धरण. महापालिकेकडून थेट आंद्रा धरणातून पाणी उचलण्याचे नियोजन आहे. त्यासाठी उभारण्यात येणार्या जॅकवेलसाठी जलसंपदा विभागाकडून धरणाजवळ जागेची मागणी करण्यात आली होती. धरणाच्या वरील बाजूस ९५ गुंठे जागा देण्यास जलसंपदा विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. जागेच्या बदल्यात महापालिकेस २ कोटी ३ लाख रुपये जलसंपदा विभागास द्यावे लागणार आहेत. जागा ताब्यात येताच, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जॅकवेल तसेच, भूमिगत जलवाहिनीची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. धरणाच्या वरील भागात जॅकवेल असल्याने महापालिकेस आवश्यकतेनुसार पाणी उचलता येणार आहे. त्यामुळे महापालिकेचे दरवर्षी पावणेदोन कोटी रुपयांची बचत होणार आहे, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. धरणापासून तळेगाव एमआयडीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. ते अंतर ८.८ किलोमीटर इतके आहे. ते काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला स्वच्छ १०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. “जलसंपदा विभागाने विभागाने आंद्रा धरणाच्या वरील बाजूस ९५ गुंठे जागा महापालिकेसाठी मंजूर केली आहे. तेथे जॅकवेल उभारण्यात येणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्या दोन्ही कामाची निविदा तयार आहे. जागा ताब्यात आल्यानंतर आयुक्तांची मान्यता घेऊन निविदा प्रसिद्ध करण्यात येईल.” – प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता.