Pimpri-Chinchwad : गणेशोत्सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे
Pimpri-Chinchwad : मेट्रोतून ४८.३२ लाख तर पीएमपीने १.२२ कोटी प्रवाशांनी केला प्रवास

पिंपरी – गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरात तसेच शहरातील विविध भागांत जाण्यासाठी नागरिकांनी मेट्रो आणि पीएमपीएमएलला मोठी पसंती दिली. पीसीएमसी, पिंपरी यांसह मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात या दोन्ही सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला कोट्यवधीचे उत्पन्न प्राप्त झाले.
यंदाच्या गणेशोत्सवात प्रवाशांनी आणि भाविकांनी प्रवासासाठी पुणे मेट्रोला अभूतपूर्व पसंती दर्शवली आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या १२ दिवसांच्या संपूर्ण कालावधीत तब्बल ४८,३२,९१५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या १२ दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोला ७,४९,२८,३७७ रुपये इतके महसुली उत्पन्न प्राप्त झाले आहे.
अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी, २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ या २४ तासांत ५,८०,२८० प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला असून एकाच दिवसात ८५,६१,८९५ रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे. मेट्रोला सर्वाधिक उत्पन्न महात्मा फुले मंडई स्थानक येथून मिळाले. त्याखालोखाल पीसीएमसी स्थानकावरुन प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला.
२०२५ साली गणेशोत्सवात ३७ लाख १७ हजार ७५८ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता. त्या तुलनेत यंदा प्रवासीसंख्येत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली. २०२४ मध्ये ही संख्या २० लाख ४५ हजार १०० होती.
पीएमपीला २१ कोटींचे उत्पन्न
पीएमपीएमएलच्या बससेवेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत १ कोटी २२ लाख ५७ हजार २३७ प्रवाशांनी पीएमपीएमएलमधून प्रवास केला. या कालावधीत पीएमपीएमएलला २१ कोटी ६६ लाख ८२ हजार २०१ रुपयांचा महसूल मिळाला. दहा दिवसांत एकूण १७ हजार ७४८ बसफेऱ्या झाल्या.
दररोज सरासरी १ हजार ७५५ बस रस्त्यावर धावत होत्या. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मेट्रो आणि पीएमपीएमएलने वाढीव सेवा उपलब्ध करून दिल्याने पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जनासाठी प्रवास करणे सुलभ झाले. गणेशोत्सवात सार्वजनिक वाहतुकीला मिळालेला वाढता प्रतिसाद हा पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाढत्या वापराचे द्योतक ठरला.





