Pimpri Chinchwad News – पाणी पुरवठ्याच्या अनियमिततमुळे आठवडाभरात दापोडी व सांगवी परिसरातील नागरिकांनी तीव्र पाणी टंचाईचा सामना केला. आठवड्याच्या सुरुवातीला काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने विशेषतः कामावर जाणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सांगवीमध्ये पाणी विक्रीचे केंद्र सुरू झाले असून नागरिक रांगेत उभे राहून पिण्यासाठी पाणी विकत घेत आहेत. या परिसरात आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिक एवढ्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच सांगवी आणि दापोडी परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन-तीन दिवस काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने विशेषतः कामावर जाणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय झाली. आंघोळ, कपडे धुणे तसेच दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान, नियोजित शटडाऊनमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला असून महिला वर्गाचा अक्षरशः जीव भांड्यात पडल्याची भावना व्यक्त होत आहे. सांगवी दापोडी परिसरात तीव्र पाणी टंचाई. प्रशासनाच्या मते, वाढती लोकसंख्या आणि सुरू असलेली जलवाहिनीची कामे ही पाणीटंचाईची प्रमुख कारणे आहेत. गेल्या पाच वर्षांत सांगवी-दापोडी परिसराचा झपाट्याने विस्तार झाला असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मात्र पाणीपुरवठ्याची क्षमता त्यानुसार वाढलेली नाही. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील जलवाहिनी प्रकल्प मे-जूनपर्यंत पूर्ण करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागल्यानंतर अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊन समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, दरवर्षी समाधानकारक पाऊस होऊनही नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पाणी विकत घेण्यासाठी रांग सांगवीमध्ये दिवसा आणि रात्री देखील पाणी विकत घेण्यासाठी नागरिकांना रांग लावावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी लहान मोठे कॅन घेऊन रांगेत उभे असतात. दोन नद्यांच्या काठावर वसलेल्या आणि नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात पाण्याची भीषण टंचाई सांगवीकर पहिल्यांदाच अनुभवत आहेत.