Pimpri Chinchwad News : मेट्रो कामांमुळे रस्त्यावर चिखल! निगडी ते आकुर्डी मार्गावर वाहनचालक त्रस्त; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Pimpri Chinchwad News : निगडी परिसरात सकाळ-संध्याकाळच्या गर्दीत वाहतुकीचा खोळंबा; चिखलामुळे अपघाताचे सावट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप.
Updated On:

Pimpri Chinchwad News – निगडी चौक ते आकुर्डी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व मुरूम साचून चिखलाचे थर निर्माण झाले आहेत. यामुळे वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून अपघाताचा धोका गंभीर बनला आहे. मेट्रो बांधकामातून पडणारी माती थेट रस्त्यावर साचत असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रश्न अधिक तीव्र होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या समस्येबाबत अग्निशामक विभागाचा मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाशीही संपर्क साधण्यात येत असून रोड क्लिनर व रोड वॉशर वाहने पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणी नियमित साफसफाई, पाण्याची फवारणी व माती रोखण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





