Pimpri Chinchwad News: रिक्षा-कॅब चालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित! आरटीओ कार्यालयातील ‘त्या’ बैठकीत नक्की काय घडलं?
Pimpri Chinchwad News: प्रशासनाला १५ ऑगस्टपर्यंतचा 'अल्टिमेटम'; मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा.

Pimpri Chinchwad News – टू व्हीलर टॅक्सीला विरोध, पिंक रिक्षा योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी तसेच रिक्षाचालक-मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विविध रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालक संघटनांच्या वतीने सोमवारी (दि. १०) पिंपरी व पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची आरटीओ प्रशासनाने तत्काळ दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले.
त्यानंतर झालेल्या दोन तासांहून अधिक काळाच्या बैठकीनंतर आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
आरटीओ स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच टू व्हीलर टॅक्सी, पिंक रिक्षा टेंडर आणि अॅग्रीगेटर पॉलिसी यांसारख्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित मागण्या वरिष्ठ पातळीवर आणि शासनाकडे तातडीने पाठविण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीनंतर १५ ऑगस्टपर्यंत प्रशासनाकडून चर्चेनुसार कार्यवाही करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
या कालावधीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ ऑगस्टनंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने दिला आहे. बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, मोटार वाहन निरीक्षक अमोल मालठाणे, कसबे, अभिजीत तरकसे, प्रशासकीय अधिकारी मनोज बागमार, कर्मचारी अमोल सदरे, विवेक भास्कर यांच्यासह आरटीओ अधिकारी उपस्थित होते.





