Pimpri Chinchwad News – शहराच्या मुख्य दळणवळण मुंबई-पुणे महामार्गांवर सुरू असलेल्या महामेट्राच्या कामांचा वेग संथ झाल्याने निगडी ते पिंपरी या दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न भीषण रूप धारण करत आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी या प्रमुख रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. नागरिकांना अक्षरशः तासन्तास रस्त्यात अडकून राहावे लागत आहे. नियोजनाचा अभाव, अर्धवट कामे आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे हा मार्ग ‘अपघातप्रवण पट्टा’ ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मेट्रोच्या खांबांसाठी आणि उड्डाणपुलांच्या कामांसाठी मध्यभागी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला असून, वाहने एकमेकांना चुकवत पुढे सरकत आहेत. काही भागात राडारोडा, उघडी खंदक आणि तात्पुरती वळणे असल्याने वाहनचालकांना सतर्कतेने वाहन चालवावे लागत आहे. विशेषतः निगडीतील टिळक चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन येथील मार्ग येथे सकाळी व सायंकाळी प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. काही ठिकाणी पर्यायी रस्त्यांची स्पष्ट माहिती नसल्याने वाहनचालक गोंधळतात आणि कोंडी आणखी वाढते. विरुद्ध दिशेची वाहतूक; अपघाताचा धोका रस्ता बंद किंवा अरुंद झालेल्या भागांत वेळ वाचवण्यासाठी काही वाहनचालक उलट्या दिशेने वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. या बेजबाबदारपणामुळे किरकोळ धडकांची मालिका सुरू असून, मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि औद्योगिक भागातील मालवाहतूक वाहनांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी ‘वाहतूक पोलीस’ कुठे? कोंडीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ‘पोलीस’ कर्मचारी अपुरे असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. बहुतांश चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी दुपारीच्या वेळी कर्मचारी नसताना इतर भागांत दंडात्मक कारवाईवर भर दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे “नियमनापेक्षा दंडालाच प्राधान्य?” असा सवाल उपस्थित होत आहे. धुळीचे ढग आणि आरोग्याचा प्रश्न खोदकाम आणि बांधकाम साहित्यामुळे परिसरात धुळीचे ढग उसळत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढते. स्थानिक नागरिक, दुकानदार आणि शाळकरी मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे सांगितले जात आहे. ‘ब्लॅक स्पॉट्स’ ठरलेले भाग निगडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने येथील रस्ता अरूंद झाला आहे. मात्र याचा ताण या महामार्गाला जोडणा-या अंतर्गत मार्गावरही झाला आहे. पिंपरी ते निगडी दरम्यानचे चौक हे सध्या सर्वाधिक कोंडीचे केंद्रबिंदू ठरत आहेत. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून नागरिक हैराण होत आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता, वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवणे अत्यावश्यक बनले आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक आता लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या प्रमुख मागण्या -मेट्रोचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून मुख्य मार्ग तातडीने मोकळे करावेत. -उलट्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. -अनधिकृत पार्किंग व नादुरुस्त वाहने हटवावीत. -महत्त्वाच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी ‘पोलीस’ तैनात करावेत. -धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी करावी.