Pimpri Chinchwad News – नो पार्किंग आणि पदपथावर वाहने पार्क केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. नागरिकांवर कारवाई केली जात असताना वाहतूक पोलिसांनी नियम मोडले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांची टोईंग क्रेन अनेकदा निमयांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी राखीव असते. मात्र अशा ठिकाणी वाहन उभे केल्यास पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागतो आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वाहतूक नियमांनुसार झेब्रा क्रॉसिंग किंवा स्टॉप लाईनच्या पुढे वाहन थांबवण्यास मनाई आहे. तरीही संबंधित सरकारी वाहन अशा ठिकाणी उभे असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासोबतच या वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नसल्याचेही दिसून येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाहनांची ओळख स्पष्ट व्हावी, बनावट नंबर प्लेट रोखल्या जाव्यात तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी केंद्र सरकारने सर्व सरकारी तसेच व्यावसायिक वाहनांवर एचएसआरपी बसवणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस मोटार वाहन कायदा १९८८ तसेच रस्ते वाहतूक नियम २०१७ नुसार सार्वजनिक ठिकाणी वाहन अशा प्रकारे उभे करणे ज्यामुळे इतर रस्ते वापरकर्त्यांना धोका, अडथळा किंवा गैरसोय होईल, हा गुन्हा आहे. याशिवाय रुल्स ऑफ द रोड रेग्युलेशन मधील नियम १९ (१) नुसार स्टॉप लाईनच्या पुढे किंवा झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे प्रतिबंधित आहे. अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. दरम्यान, शहरात अनेकदा सामान्य नागरिकांच्या वाहनांवर तात्काळ ई-चलनद्वारे कारवाई केली जाते. चुकीच्या पार्किंगपासून ते हेल्मेट, सीटबेल्ट किंवा सिग्नल उल्लंघनापर्यंत विविध कारणांवर दंड आकारला जातो. मात्र काही वेळा सरकारी वाहनांबाबत किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या वाहनांबाबत कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असते. त्यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी याच पार्श्वभूमीवर MH-03-CD-1235 या टोईंग क्रेनने यापूर्वी किती वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, याची तपासणी करावी. तसेच त्या वेळी ड्युटीवर असलेल्या संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक असल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. यामुळे वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखली जाईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. दुपट्ट दंडाची तरतूद मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ मधील कलम २१० – बी नुसार जर सरकारी अधिकारी किंवा नियमांची अंमलबजावणी करणारी संस्था स्वतःच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले, तर त्यांच्यावर दुप्पट दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातही संबंधित वाहनावर व त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. “अनेक वेळा सामान्य नागरिकांच्या वाहनांवर तात्काळ कारवाई केली जाते; मात्र सरकारी वाहन किंवा व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई टाळली जाते. कायद्याची अंमलबजावणी सर्वांवर समान असणे आवश्यक आहे.” – ॲड. एस. परदेशी