Pimpri Chinchwad News : इंदुरीकर महाराज अन् आनंद पिंपळकर; पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे ‘अहिंसा पुरस्कार’ जाहीर
Pimpri Chinchwad News : समाजप्रबोधन, वास्तुशास्त्र, शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; जैन महासंघाची मोठी घोषणा.

Pimpri Chinchwad News – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी दिले जाणारे अहिंसा पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, सेवाभावी समाजसेवक एम. ए. हुसेन आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्व डॉ. मनोज देवळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. ३१) अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा, भक्ती संध्या आदी विविध कार्यक्रमांसह या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजावर सकारात्मक ठसा उमटवणाऱ्या, तसेच शाकाहार आणि अहिंसेच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दीर्घकाळ समाजप्रबोधन केले आहे.
वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांनी वास्तुशास्त्र आणि समाजसेवा क्षेत्रात कार्य केले आहे. ज्ञान प्रबोधिनीचे केंद्र संचालक डॉ. मनोज देवळेकर यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच एम. ए. हुसेन यांनी निराधार ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत मानवतेचा आदर्श निर्माण केला आहे.
यापूर्वी अण्णा हजारे, पोपटराव पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे, बाबासाहेब पुरंदरे, उल्हास पवार, शेखर गायकवाड, गुरु गोविंद गिरी महाराज यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार समितीचे प्रमुख व महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, उमेश पाटील, विलासकुमार पगारिया तसेच विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी ही माहिती दिली.





