पिंपरी चिंचवड: गटबाजी नको, प्रश्नासंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करा: हर्षवर्धन सपकाळ

Hrashvardhan Sapkal | काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्वषर्धन सपकाळ हे काल पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी काँग्रेस भवनाला भेट देत पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात सध्या औरंजेबाच्या कबर उखडून टाकण्याच्या मुद्यावर भाष्य केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत बोलणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप देखील त्यांनी केला. तसेच राज्यातील विविध मुद्यांवरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पुण्यानंतर सपकाळ यांनी पिंपरी चिंचवड येथील पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षात गट-तट चालणार नाहीत. कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला.
तसेच रस्त्यावर उतरून संघर्ष करा, असा सल्ला त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. सपकाळ हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. काँग्रेस भवनात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक बाबू नायर, उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, नरेंद्र बनसोडे, प्रवक्ते गौरव चौधरी, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, श्यामला सोनवणे उपस्थित होते.
प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करा
कार्यकर्त्यांशी सपकाळ यांनी संवाद साधत संघटनात्मक ताकद वाढवावी. पक्षाचे संघटन बळकट करून बूथ कमिट्या सक्षम कराव्यात. सदस्यनोंदणी करावी. यापूर्वी प्रदेश नेत्यांचे शहराकडे दुर्लक्ष झाले असेल, परंतु यापुढे होणार नाही. मी स्वतः शहराकडे लक्ष देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावे. महापालिकेत काँग्रेसचा प्रतिनिधी असलाच पाहिजे. काही दिवसांत शहरात निरीक्षक पाठवले जातील. ते सर्वांच्या समस्या जाणून घेतील, असे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, अशी सूचना सपकाळ यांनी बैठकीत दिली.
पक्षात दोन मतप्रवाह
शहरात पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचत नाही. पक्षात कमकुवत होत असतानाही गटबाजी कायम आहे. नेते आल्यानंतर पदाधिकारी एकत्र येतात. पण, नेते पुढे जाताच गटबाजी सुरू होते, अशा तक्रारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केल्या असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात पक्षाचा एक मेळावा घेण्याची मागणीही केली. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी की महाविकास आघाडीसोबत यावरून कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.





