पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशा शहरातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने भाजपपुढील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यातच भोसरी विधानसभेवर लक्ष केंद्रित करत या ठिकाणच्या बंडखोर आणि नाराजांशी उपमुख्यमंत्र्यांनी “गुफ्तगू’ केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी अथवा मार्च 2022 मध्ये होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 15 वर्षे एकहाती वर्चस्व राखलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने चारीमुंड्या चित करत सत्तेतून हद्दपार केले.
मात्र, गेल्या साडेचार वर्षांत भाजपाने केलेल्या कारभारावर त्याच पक्षाच्या नगरसेवकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचा फायदा राष्ट्रवादीने उचलण्यास सुरुवात केल्याचे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच लक्ष घातल्याचे दिघीतील बैठकीतून समोर आले आहे.
अजित पवार हे शुक्रवारी एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. या वेळी दिघी येथील माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्या निवासस्थानी भोसरी भाजपातील काही नाराजांची बैठक घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तर भाजपापासून फारकत घेतलेले भोसरीतील भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे व चिखलीतील नगरसेवक संजय नेवाळे यांच्याशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
भोसरी हा भाजपाचा गेल्या काही वर्षांपासून बालेकिल्ला मानला जात आहे. याच बालेकिल्ल्याला भगदाड पाडल्यास महापालिकेवर सत्ता आणणे सोपे जाणार असल्याने थेट उपमुख्यमंत्र्यांनीच नाराजांशी संवाद साधल्याने राजकीय वर्तुळासह भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
सुमारे दोन तास झालेल्या या चर्चेतून येणाऱ्या महापालिका निवडणुकीबाबत काही आखणी केल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. तर भाजपाच्या नाराजांची यादी तयार करून त्यापैकी विजयी होण्याची क्षमता असणाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली जाणार आहे.
येऊ इच्छिणारे आणि नाराज तसेच नात्या-गोत्याच्या राजकारणाला कंटाळलेल्यांना राष्ट्रवादीकडून पहिले टार्गेट केले जाण्याची व्यूहरचना या वेळी तयार केली आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांनीच भाजपाला शह देण्यास सुरुवात केल्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपा आणि राष्ट्रवादीत काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माजी नगरसेवक होणार आक्रमक
दिघीतील बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी नगरसेवकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी माजी नगरसेवकांना सक्रिय आणि आक्रमक होण्याचा सल्ला दिला. भाजपला घेरण्याचा पहिला प्रयत्न माजी नगरसेवकांच्या माध्यमातूनच सुरू होण्याची शक्यता असल्याने काही दिवसांत त्याचा प्रत्यय येईल, अशी माहिती एका उपस्थिताने दिली.
फोडाफोडीचा इतिहास आणि सत्ता
राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर सन 2002 पासून या पक्षात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली आहे. गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीतही अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या डझनभर नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेतले होते.
स्थानिक नेत्यांचा अतिआत्मविश्वास आणि मोदी लाटेमुळे राष्ट्रवादी सत्तेतून हद्दपार झाली होती. मात्र, येणारी महापालिका निवडणूक, अजित पवार यांनी घातलेले लक्ष आणि आतापर्यंतचे फोडाफोडीची राजकारण पाहता भाजपाचे किती नगरसेवक फुटतात यावरच महापालिकेतील सत्तेची गणिते अवलंबून राहणार आहेत, हे मात्र निश्चित.