Pimpri Chinchwad Deforestation : चिंचवडच्या नावातील ‘चिंच’ हरवली? २ दशकात लाखो वृक्षांचा बळी; पाहा धक्कादायक वास्तव
Pimpri Chinchwad Deforestation : हवामान बदल आणि अनियंत्रित वृक्षतोडीचा जैवविविधतेवर मोठा आघात; चिमण्यांसह अनेक लहान जीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट.

Pimpri Chinchwad Deforestation – एकेकाळी पिंपळ, वड, चिंच आणि विविध देशी वृक्षांच्या दाट सावलीने नटलेले पिंपरी-चिंचवड शहर आज झपाट्याने कमी होत चाललेल्या वृक्षसंपदेच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या विविध अहवाल आणि उपलब्ध आकडेवारीतून शहरातील हरित क्षेत्र चिंताजनक वेगाने घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाढते शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, बांधकाम प्रकल्प, अनियंत्रित वृक्षतोड आणि वृक्षसंवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे लोकसंख्या वाढली, नवीन रस्ते, इमारती आणि व्यावसायिक संकुले उभी राहिली.
मात्र या विकासाच्या तुलनेत वृक्षसंवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाहीत. परिणामी शहरातील नैसर्गिक हरित पट्टे मोठ्या प्रमाणात कमी झाले. वृक्ष पुनर्लागवड आणि पुनर्रोपण प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक ठिकाणी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात लावलेली रोपे टिकली नाहीत. काही भागांत वृक्षचोरीच्या घटनाही घडल्या आहेत.
त्यामुळे शहरातील एकूण वृक्षसंख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. महापालिका प्रशासन शहरात ३२ लाख १६ हजार झाडे असल्याचा दावा करत असले, तरी लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या अपुरी असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. वृक्षसंख्या घटण्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाळ्यात पारा ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचत आहे.
काँक्रीटीकरणामुळे उष्णता साठून राहते आणि वातावरण अधिक तापते. त्याचबरोबर वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण आणि मृदाप्रदूषणातही वाढ होत आहे. भूजल पातळी सातत्याने खालावत असून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वृक्षसंपदेच्या ऱ्हासाचा परिणाम जैवविविधतेवरही होत आहे. अन्नसाखळीतील अनेक पक्षी आणि लहान जीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. विशेषतः चिमणीसारखे पक्षी अनेक भागांतून जवळपास अदृश्य झाले आहेत. ऋतूचक्रात होत असलेले बदल, वाढती उष्णता आणि अवकाळी पावसाच्या घटनांमध्ये वाढ यामागेही हरित क्षेत्रातील घट हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.
परिस्थिती सुधारण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. शाळांमध्ये वृक्ष दत्तक योजना, देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड, आधुनिक रोपवाटिका, नियमित वृक्षगणना, सेंद्रिय खत प्रकल्प आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांसारख्या उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली हरवत चाललेली हिरवाई भविष्यात मोठ्या पर्यावरणीय संकटाचे कारण ठरू शकते.





