Pimpri-Chinchwad: अखेर भाजपाने स्वीकृत नगरसेवकांची नावे केली जाहीर
नियुक्ती एक महिना लाबंणीवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपच्या सात नावांची अखेर महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी (दि.२०) घोषणा केली. भाजपकडून सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे आणि ऋषिकेश म्हेत्रे यांना संधी देण्यात आली आहे.
प्रशासनाने मार्च महिन्यात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव आणला होता. मात्र, सत्ताधारी भाजपकडून या नियुक्तीला विलंब झाला. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांचा नऊ महिन्यांचा कालावधी वाया गेला.
पुन्हा सभेच्या दिवशी नावांची घोषणा करून सात नावांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मार्चपासून रखडलेला विषय मार्गी लागणार, हे निश्चित झाले. परंतु, अधिकृत नियुक्ती आणखी महिनाभर लांबणीवर पडली आहे.
भाजपकडून चिंचवड विधानसभेतून जयनाथ काटे, सचिन साठे, विशाल कलाटे, भोसरीतून ऋषिकेश म्हेत्रे, कुलदीप परांडे आणि पिंपरी विधानसभेतून राजेश पिल्ले आणि कुणाल लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सर्वांना १५ महिन्यांचा म्हणजेच सव्वा वर्षांचा कालावधी असणार आहे. या सर्वांची कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे.
आयुक्तांमार्फत प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख या तिघांना संधी दिलेली आहे. भाजपच्या सात जणांसोबतच त्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल.
भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी अनेक इच्छुकांनी दावा केला होता. यामध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या नियुक्तीत संधी मिळावी, म्हणून स्थानिक व राज्यातील नेत्यांकडे मागणी लावून धरली होती. मात्र, तसे असताना निष्ठावंताना डावलण्यात आले.
त्यांच्यासह संधी न मिळाल्याने काही आमदार समर्थकांमध्येही नाराजी आहे. पक्षनिष्ठेपेक्षा नेत्यांशी जवळीक, राजकीय समीकरणे आणि गावकी-भावकी महत्त्वाची ठरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत धूसफूस देखीच चव्हाट्यावर आली आहे.
भाजपकडून महिलांना प्रतिनिधित्व नाही
स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत ५० टक्के जागा महिला आरक्षणाची तरतूद आहे. निवडून आलेल्या नगरसेविकांबरोबर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप काही महिला कार्यकर्त्यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र, सातही जागांवर पुरषांना संधी देण्यात आली. त्यामुळे महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार भाजपने का केला नाही, अशी चर्चाही सुरु झाली आहे.




