Pimpri Chinchwad : सुशोभीकरण की झाडांचा बळी? पदपथावरील सिमेंट काँक्रीटमुळे वृक्ष मरणासन्न; पर्यावरणप्रेमींचा संताप
Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील अर्बन स्ट्रीट प्रकल्पात झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आवरण; नैसर्गिक माती अभावी वृक्ष संवर्धन धोक्यात.

Pimpri Chinchwad – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सिमेंट व डांबरी रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती पुरेशी मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी न केल्याने झाडांचा श्वास कोंडू लागला आहे. सिमेंट, डांबरी रस्त्यांची कामे, अर्बन स्ट्रीटनुसार पदपथ विकसित करताना रस्त्यालगत असलेल्या बहुतांश झाडांच्या बुध्याभोवती कंत्राटदाराने सिमेंटचे आवरण केल्याचे सर्रास दिसत आहे.
यामुळे झाडांना पाणी टाकता येत नाही. मुळांना व्यवस्थित पाणी मिळत नसल्याने झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे काही झाडे मरणासन्न अवस्थेत येऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरात तब्बल ३२ लाख झाडे असल्याचे वृक्षगणनेतून उघड झालेले आहे. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडांच्या बुंध्याला एक मीटर चौरस माती असायला हवी. परंतु शहरात ठिकठिकाणी झाडांना सिमेंट काँक्रीटचे आवरण केले जात आहे.
अनेक झाडांना चक्क बांधकामातील मलब्याचे ‘खाद्य’ पुरविण्यात येत आहे. त्यामुळे ही झाडे जगणार कशी? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. झाडे जगणे ही काळाची गरज असून, पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे आहे. राज्यशासन, स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवितात. मात्र, वृक्ष संवर्धनासाठी म्हणावे तसे पाऊल उचलण्यात येत नसल्याचे वास्तव या प्रकारावरून दिसून येत आहे.
झाडांच्या मुळांना नैसर्गिक माती हवी असते. त्यांच्या मुळाशी सिमेंट म्हणजे झाडांसाठी एकप्रकारे विषच आहे. त्यामुळे झाडे मरूही शकतात, अशी शक्यता काही पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. झाडांचा जीव घेऊ पाहणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही वृक्ष प्रेमीतून होऊ लागली आहे. तसेच रस्ते सुशोभीकरणासाठी केलेले काम फक्त देखावा ठरत अससल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
महापालिकेच्या उद्यान विभागाने निगडी – भोसरी रस्त्यावरील के.एस. बी चौकानंतर रस्त्याच्या बाजूने पदपथाला लागून असलेल्या उद्यानामध्ये सिमेंटचा राडारोडा टाकलेला आहे. त्यामध्येच मातीचा कण ही नाही अशा या सिमेंटच्या राडारोड्यात सुशोभीकरणाची झाडे लावण्यात आलेली आहेत.






