लोणावळा : माजी विद्यार्थ्यांनी आपण जिथून घडलो त्या शाळेत, संस्थेत पुन्हा यावे व येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी आपले अनुभव कथन करत प्रेरित करावे. हा उद्देश साध्य व्हावा यासाठी मागील दोन वर्षापासून आम्ही माजी विद्यार्थ्यांसाठी बॅक टू स्कूल हा उपक्रम सुरू केला आहे. खरं तर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण शाळेत अनुभवलेले असतात. हे कायम स्मरणात राहू द्या व जेव्हा जेव्हा संस्था बोलवेल तेव्हा शाळेत येत चला, तेथील विद्यार्थ्यांना तुमचे अनुभव सांगा व त्यांना नवीन उमेद निर्माण करून द्या असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोणावळ्यात व्यक्त केले. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या शेजारी असलेल्या व इंडिया स्पॉन्सरशीप कमिटी संचलित आंतरभारती बालग्राम या संस्थेत माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्त त्या लोणावळ्यात आल्या होत्या. यावेळी या संस्थेच्या संस्थापिका डॉ. झुली नाखुदा यांच्या पुतळ्याचे अनावरण व शाळेत नव्याने बनविलेल्या डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, इंडिया स्पॉन्सरशीप कमिटीचे अध्यक्ष शैलेश दालमिया, महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग सदस्या जयश्री पालवे, विधायक भारती बाल संरक्षक अभ्यासक संतोष शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा बिरारीस, आयएससी च्या कार्यकारी संचालिका मेधा ओक, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक डॉ. संदेश कदम, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. शुभांगी भोर आदी मान्यवर उपस्थित होते.