Pimpri : कृषि सहाय्यकांच्या संपामुळे कृषि विभाग ठप्प

पवन मावळ : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कृषि सहाय्यक म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारा कर्मचारी, परंतु गेली काही दिवसांपासून राज्यभरातील कृषि सहाय्यक त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यामुळे ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिले आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात पिकासाठी प्रसिद्ध असलेला तालुका. मावळातील शेतकरी आता खरिपाच्या तयारीत गुंतले आहेत. अशात शेतकऱ्यांना खरिप बियाणे, बिजप्रक्रिया, भात लागवड तसेच फळबाग लागवड इत्यादी बाबत मार्गदर्शनाची गरज आहे. परंतु कृषि सहाय्यक संपावर असल्याने त्यांना हे मार्गदर्शन मिळत नसून याचा फटका पीक उत्पादनावर बसण्याची शक्यता आहे.
कृषि सहाय्यकांच्या प्रमुख मागण्या
कृषि सेवक तीन वर्षांचा कालावधी रद्द करणे, ऑनलाइन कामे करण्यासाठी लॅपटॉप मिळावा, कृषि सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे, ग्रामस्तरावर मदतनीस मिळणे, निविष्टा वाटपाचे मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही व्हावी, नैसर्गिक आपत्ती पंचनाम्याची कार्यपद्धती तयार करण्यात यावी, आकृतिबंध तात्काळ मंजूर करण्यात यावा इत्यादी मागण्या आहेत.
बळीराजा म्हणतोय…
मावळात शेतकऱ्यांना तयार बियाणे मिळू शकले नाहीत. बियाणे कधी आले आणि संपले तेही कळले नाही. कृषि सहाय्यक संपावर असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाहीये, असे कुसगाव पमा येथील शेतकरी दत्तात्रय साळूंके यांनी सांगितले. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असून कृषि सहाय्यक संपावर असल्याने गावामध्ये कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही, असे साळूंब्रे येथील शेतकरी अशोक थोरवे यांनी सांगितले. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतात, मग कृषि विभागातील कर्मचाऱ्यांना सुविधा द्यायला काय अडचण आहे. सरकारने कृषि सहाय्यकांच्या मागण्यात लवकर मंजूर कराव्यात, असे मळवंडी ठुले येथील शेतकरी प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. तर, कृषि सहाय्यकांना लॅपटॉप, मदतनीस तात्काळ द्यावेत आणि कृषि मित्रांना पुन्हा कामावर घ्यावे, असे शिळींब येथील कृषि मित्र लहू धनवे यांनी सांगितले.





