पिंपरी – 35 वर्षांनंतर महापालिकेवर येणार प्रशासनराज

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची मुदत 13 मार्चला संपणार आहे. राज्यामध्ये असलेली करोना परिस्थिती तसेच प्रभागरचनेचा घोळ यामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 14 मार्चला महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे. परिणामी 1986 नंतर पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासनराज येणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यामध्येच होणे अपेक्षित होते. निवडणूक वेळेत होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने नोव्हेंबर महिन्यामध्येच प्रभागरचनेची कार्यवाही सुरू केली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या 30 नोव्हेंबर 2021 च्या मुदतीत महापालिका प्रशासन आराखडा तयार करु शकले नाही.
त्यामुळे आयोगाने 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा तयार केलेला आराखडा 6 डिसेंबर 2021 रोजी पेनड्राईव्हमध्ये आयोगाला सादर केला. त्यावर 11 डिसेंबर रोजी आयोगासमोर सादरीकरण झाले. आयोगाने काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्यानुसार बदल करण्यात आले. त्यानंतर प्रारुप प्रभाग रचनेचा कागदोपत्री प्रस्ताव 15 जानेवारी 2022 रोजी सादर केला.
त्यानंतर 1 फेब्रुवारीला प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा झाला. त्यावर प्राप्त हरकतींवर सुनावणी होऊन 2 मार्च रोजी आयोगाला अहवाल सादर केला आहे. आयोगाकडून प्रभागरचना अंतिम होण्यास आणखी आठ ते दहा दिवसांचा कालवधी लागणार आहे. मात्र, चालू पंचावार्षिकमधील विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा कालावधी 13 मार्चपर्यंत आहे. 14 मार्चपासून नवीन नगरसेवक निवडणे आवश्यक होते. मात्र, सद्यस्थितीत प्रभागरचनेची प्रक्रिया, आरक्षण सोडतीसाठी लागणारा कालावधी, आचारसंहितेचा कालावधी विचारात घेता मुदतीत निवडणूक होणे शक्य नाही.
त्यामुळे 14 मार्च 2022 पासून पालिकेवर प्रशासक नियुक्ती होईल. शासनाच्या आदेशानुसार प्रशासनामार्फतच पालिकेचा कारभार होईल. त्यासाठी राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक पदी नियुक्ती केली आहे. निवडणुका होऊन महापौर नियुक्त होईपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असणार आहे.
चार वर्षे हरनाम सिंह होते प्रशासक
नगरपालिकेच्या स्थापनेनंतर 11 ऑक्टोबर 1982 रोजी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र महापालिकेची स्थापना झाली. स्थापनेनंतर 1982 ते 1986 ही चार वर्षे महापालिकेत प्रशासनराज होते. हरनाम सिंह हे आयुक्त तथा प्रशासक होते. 1986 साली महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यानंतर 35 वर्षानंतर पहिल्यांदा वेळेत महापालिकेची निवडणूक प्रक्रिया न झाल्यामुळे पालिकेचा कारभार प्रशासना मार्फत चालणार आहे.
पदाधिकाऱ्यांची वाहने जाम होणार
महापालिकेतील नगरसेवकांची 13 मार्चनंतर मुदत संपत आहे. 2017 साली 14 मार्चला महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली होती. यावेळी निवडणूक वेळेत होणार नसल्याने 14 मार्चंतर नगरसेवकांचे नगरसेवक पद राहणार नाही. तसेच महापालिकेने पदाधिकाऱ्यांसाठी दिलेली वाहने देखील त्यांना पालिकेकडे जमा करावी लागणार आहेत.
================





