प्रभात वृत्तसेवा पिंपरी – बेदरकारपणे भरधाव ट्रक चालवून दुचाकीला मागून धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास आंबेठाण ते वासुली रोडवर, साक्षी कंपनीजवळ घडली.प्रभाकर दत्तात्रय गुंजाळ (वय ३७, रा. कोरेगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संतोष मारुती गुंजाळ (वय ३०, रा. कोरेगाव बुद्रुक) यांनी मंगळवारी (दि. १६) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबूलाल पदमारामजी जाट (४३, जयपूर, राजस्थान) या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रक (आरजे १४ जीई १४१५) चालक ट्रक निष्काळजीपणे चालवत होता. त्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १४ क्यु ०१६०) मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार प्रभाकर गुंजाळ हे खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.