Pimpri Accident : भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडले, १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने कंटेनर चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २) सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई पुणे हायवेवर, देहूगाव कमानीजवळ, देहुरोड येथे घडली.दक्ष दुर्गेश सोळंकी (वय १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी दुर्गेश ताराचंद सोलंकी (वय ४०, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. २) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंटेनर (आरजे ०९ जीई ८३१६) यावरील चालक कानाराम जिवराज जाट (रा. अजमेर, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा दक्ष हा दुचाकी (एमएच १४ एमएन ०३३४) वरून कामशेत येथून पिंपरीकडे जात होता.
त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या कंटेनरवरील आरोपी चालकाने कंटेनर निष्काळजीपणे, बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवून दक्षच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दक्षला पोटाला व उजव्या कमरेला गंभीर जखमी होऊन तो मरणास कारणीभूत झाला. तसेच, त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. देहुरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





