Pimpri Accident : बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना! लिफ्टच्या डक्टमध्ये पडून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लिफ्टच्या डक्टवर सुरक्षिततेसाठी कोणतीही जाळी न लावल्याने आणि कामगारास सेफ्टी बेल्ट न पुरवल्याने काम करताना खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी द स्कायलार्क सोसायटी, किवळे येथे घडली.मोहम्मद जैद अब्दुल कलाम खान (वय २०) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. कयामुद्दीन अब्दुल कलाम खान (वय २८, रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. १९) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार असगर अली खान (वय ३६, रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीचा भाऊ मोहम्मद जैद अब्दुल कलाम खान हा द स्कायलार्क सोसायटी किवळे येथे चौथ्या मजल्यावर काम करत असताना, तेथून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी लिफ्टच्या डक्टमध्ये कोणतीही सुरक्षेची जाळी लावलेली नव्हती. तसेच कोणताही सेफ्टी बेल्ट पुरवण्यात आला नव्हता. अशा असुरक्षित ठिकाणी काम करण्यास सांगितल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला.





