Pimple Gurav News: स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार! सृष्टी चौकातील पदपथावर मृत्यूचा सापळा; नक्की जबाबदारी कोणाची?
Pimple Gurav News: पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातील जगताप पाटील उद्यानासमोरील पदपथावर धोकादायक खड्डा; केबलच्या कामानंतर दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

Pimple Gurav News – पिंपळे गुरव येथील सुष्टी चौकातील कै. बॅट्टूराव गेनुजी जगताप पाटील उद्यानासमोरील पदपथावर मोठा आणि धोकादायक खड्डा निर्माण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पदपथावरील सिमेंट ब्लॉक व फरशी निखळल्यामुळे हा खड्डा निर्माण झाला असून, त्याकडे संबंधित विभागाचे अद्याप गांभीर्याने लक्ष गेलेले नाही.
या मार्गावर सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच गर्भवती महिलांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पदपथावरील या खड्ड्यामुळे नागरिकांना सावधपणे मार्गक्रमण करावे लागत असून, पाय अडकून दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असताना पदपथाची अवस्था खराब झाली.
मात्र काम पूर्ण झाल्यानंतर पदपथ पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करताना विविध विकासकामे केली जात असली, तरी त्यानंतर रस्ते, पदपथ व फरशांची पूर्ववत दुरुस्ती झाली की नाही, याची पाहणी कोण करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे यांनी महावितरण विभागाने संबंधित कामाची जबाबदारी स्वीकारून तातडीने खड्डा बुजवावा, अथवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. एखादे काम महावितरणकडून झाले तर जबाबदारी स्थापत्य विभागाकडे,
तर पालिकेकडून झालेल्या कामाची जबाबदारी दुसऱ्या विभागाकडे ढकलली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जबाबदारी कोणाची हा वाद न करता नागरिकांची सुरक्षितता हीच प्राथमिकता असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून पदपथ पूर्ववत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.





