सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे गाव म्हणून पिंपरखेड गावाचा गौरव; सलग तेरा वेळा पटकावला पहिला क्रमांक

जांबूत : भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25 गाळप हंगामात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे गाव म्हणून पिंपरखेड (ता. शिरूर) यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गुरुवारी (दि. 04 सप्टेंबर) पारगाव (ता. आंबेगाव) येथील कारखान्याच्या ठिकाणी आयोजित समारंभात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि संचालक मंडळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
पिंपरखेड गावाने सलग 13 वर्षे सर्वाधिक ऊस पुरवठादार गाव म्हणून आपला नावलौकिक कायम राखला आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरवर्षी आयोजित ऊस पिक स्पर्धेत पिंपरखेडने यंदा 60,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे बक्षीस पटकावले. गावाचे सरपंच राजेंद्र दाभाडे आणि ग्रामस्थांनी हे बक्षीस स्वीकारले. या हंगामात पिंपरखेडने 43,274 मेट्रिक टन ऊस पुरवठा करून सर्वाधिक योगदान दिले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, उपसरपंच विकास वरे, सोसायटी अध्यक्ष किरण ढोमे, माजी उपसरपंच रामदास ढोमे, नानाभाऊ गावशेते, दिलीप बोंबे, माजी सैनिक बळवंत बोंबे, शांताराम बोंबे, कैलास टेमकर, विजय पडवळ, अशोक ढोमे यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




