Leopard Trapped : पिंपरखेडच्या हॉटस्पॉटवर बिबट्या जेरबंद! वनविभागाची तत्परता; शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला
Leopard Trapped : पिंपरखेड बीटमध्ये आतापर्यंत ४६ बिबटे कैद; जुन्नर वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन, नवीन बिबट्यांच्या शिरकावाची शक्यता.

Leopard Trapped – बिबट दुर्घटनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरलेल्या पिंपरखेड (ता. शिरूर) येथे (दि.२७) पहाटे मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेला विद्यार्थी रोहन बोंबे याच्या घटनास्थळापासून केवळ पाचशे फुटांवर शेतकरी विशाल रोहिदास बोंबे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटेकचा निश्वास सोडला. पिंपरखेड बिटअंतर्गत ४६ बिबट आजपर्यंत वनविभागाने जेरबंद केले आहे.
गेली अनेक दिवस आंबेवाडी परिसरातील नागरिकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी स्थानिकांच्या मागणीनुसार लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट जेरबंद झाला. वनरक्षक लहू केसकर, वनकर्मचारी महेंद्र दाते, बेस कॅम्प टीमच्या मदतीने ही कारवाई केली असून अजूनही परिसरात बिबट असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे.
अशीच कार्यवाही सुरू राहिल- राजहंस
जुन्नरच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस म्हणाल्या, सध्याच्या काळात अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्याचा मुक्त संचार परिसरात वाढलेला असून पावसाळ्याचा दिवसात घडलेल्या घटनाचे प्रमाण अधिकचे आहे. या भागातून आतापर्यंत ४६ बिबटे जेरबंद केले. एक नरभक्षक बिबट्या ठार केला आहे. या आधीच्या काळात या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व बिबट्याना वनविभागाने पकडून जेरबंद केले आहे.
मात्र या भागातून बिबट्याची संख्या कमी झाल्याने बाहेर परिसरातील बिबटे अन्नाच्या शोधात त्यांची जागा घेत असुन यापुढील काळात अशाच कारवाया वनविभागाकडून चालू राहणार असुन नागरिकांनी लहान मुले व आपली काळजी घ्यावी तसेच बिबट निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.





