इस्तंबुल (तुर्कीये) : तुर्कीयेच्या मध्यभागात आज एक हॉट एअर बलून कोसळल्याने या बलूनच्या पायलटचा मृत्यू झाला. तर अन्य १९ जण जखमी झाले. जखमी झालेले सर्व इंडोनेशियाचे पर्यटक होते, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. लिहारा व्हॅली येथील उड्डाण केलेल्या आणखी एका हॉट एअर बलूनला देखील आज काळच्या सुमारास अचानक खाली उतरावे लागले. या इमर्जन्सी लॅन्डिंगमुळे बलूनमध्ये असलेले १२ भारतीय पर्यटक किरकोळ जखमी झाले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. वाऱ्याची दिशा अचानक बदलल्यामुळे हे दोन्ही बलून भरकटले होते, असे सरकारी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पहिल्या टनेतील बलून अक्साराय प्रांतातील गोझलूकुयू या गावात अचानक उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या प्रयत्नादरम्यान पायलट बलूनमधून खाली पडल्याने मरण पावला. पायलटचा पाय बलूनच्या दोरीमध्ये अडकला होता, असे या प्रांताच्या गव्हर्नरांनी सांगितले. तुर्कीयेतील पुरातन चर्च आणि पर्वतशिखरांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी हॉट एअर बलूनमधून सफर करत असतात. २०२२ मध्ये झालेल्या अशाच एका बलूनच्या दुर्घटनेत स्पेनच्या २ पर्यटकांचाही मृत्यू झाला होता.