काश्मीरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; 29 वर्षीय पायलटचा मृत्यू; सह-पायलट गंभीर

श्रीनगर- आजारी लष्करी जवानांना घेऊन जाणारे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. उत्तर काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमधील तुलियाल भागात नियंत्रण रेषेजवळील भागात चित्ता हेलिकॉप्टर कोसळले असून या अपघातात पायलटचा मृत्यू झाला तर सह-पायलट गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्घटनेसंदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्याकडून माहिती देण्यात आली. संरक्षण पीआरओ, श्रीनगर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, हेलिकॉप्टरचा गुजरन, बारौब येथील फॉरवर्ड पोस्टशी संपर्क तुटला. त्यानंतर लगेचच भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टर शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष बर्फाच्छादित गुजरानमध्ये सापडले.
पायलट संकल्प यादव वय 29 यांचा रुग्णालयात उपचादरम्यान मृत्यू झाला आहे. मेजर यादव यांना 2015 मध्ये नियुक्त करण्यात आले होते आणि ते मूळचे जयपूर, राजस्थानचे होते.
दुसऱ्या पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही आणि ज्या भागात हा अपघात झाला तो भाग पूर्णपणे बर्फाने झाकलेला असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.





