Delhi News : दिल्लीत विमान उतरल्यानंतर पायलटचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

नवी दिल्ली : गुरूवारी दिल्लीत एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. श्रीनगर-दिल्ली विमान उतरल्यानंतर पायलट विमानतळावर इतर औपचारिकता पूर्ण करत असताना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली.
विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, लँडिंगनंतर पायलटला त्रास होऊ लागला आणि काही वेळाने तो बेशुद्ध पडला. पायलटला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या वैमानिकाचे नाव अरमान आहे. अरमान २८ वर्षांचा होता आणि त्याचे नुकतेच लग्न झाले होते. विमान उतरल्यानंतर कॉकपिटमध्ये पायलटला उलट्या झाल्या आणि त्यानंतर एअरलाइनच्या डिस्पॅच ऑफिसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला, असे सहकारी क्रू मेंबर्सनी सांगितले.
हृदयविकाराच्या झटक्यामागील नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी, कधीकधी विमानात हवेच्या गोंधळामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. पायलटच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच हे कळेल.
आम्ही पायलटच्या कुटुंबासोबत- इअर इंडिया
एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आमच्या सहकाऱ्याच्या निधनाबद्दल आम्ही आमच्या मनापासून शोक व्यक्त करतो. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत आणि सर्वतोपरी मदत करत आहोत. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि कोणत्याही अनावश्यक चर्चा टाळाव्यात.





