Gujarat Election | दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविणाऱ्या भाजपाने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेतही मोठा विजय मिळवला. रविवारी (१६ फेब्रुवारी) गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ हजार १७८ जागांसाठी मतदान झाले आहे. सध्या गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने ६८ पैकी ६० नगरपालिका आणि सर्व 3 तालुका पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जवळपास १५ नगरपालिकेत विजय मिळवण्याची कामगिरी देखील भाजपने केली आहे. काँग्रेस पक्षाला फक्त एकाच नगरपालिकेत विजय मिळवता आला आहे. तर समाजवादी पक्ष दोन नगरपालिकांमध्ये विजयी झाला आहे. मुस्लीम उमेदवारांची संख्याही वाढली १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपाने २,१७१ पैकी १,६०८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. ज्यात महानगरपालिका, नगरपालिका महामंडळे आणि जिल्हा व तालुका पंचायतींचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, मतदान झालेल्या ६६ नगरपालिकांमध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्याही वाढली आहे. २०१८ मध्ये गुजरातमधील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाच्या तिकिटावर ४६ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत ही संख्या ७६ वर पोहोचली आहे. यात ३३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने एकूण १०३ मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले होते. यापैकी अनेक उमेदवारांनी पाटण, खेडा, पंचमहल आणि जुनागढ जिल्ह्यांमधील नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१८ मध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये २५२ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते. यावर्षी ही संख्या २७५ वर पोहोचली आहे. यामध्ये भाजपाच्या तिकिटावर विजयी झालेले २८ टक्के मुस्लीम उमेदवार आहेत. सात वर्षांपूर्वी भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या १८ टक्के होती. सर्वाधिक ३९ टक्के मुस्लीम उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. तर आम आदमी पार्टीकडून निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या ४.९ टक्के इतकी आहे. आपचे १३ मुस्लीम उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. ज्यामध्ये जामनगरमधील सलाया नगरपालिकेतील ११ उमेदवारांचा समावेश आहे. २०१८ मध्ये काँग्रेसने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २०६४ पैकी ६३२ जागांवर विजय मिळवला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत त्यांना केवळ २५२ जागांवरच विजय मिळवता आला. आता काँग्रेसकडून विजयी झालेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्याही १३३ वरून १०९ पर्यंत आली. दरम्यान, २०२७ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.