Phugewadi Liquor Case : दोषी अधिकाऱ्यांनाही सोडू नका, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आमदार शंकर जगताप आक्रमक
Phugewadi Liquor Case : दोषी पोलिसांनाही सोडू नका, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! फुगेवाडी विषारी दारूकांडानंतर आमदार शंकर जगतापांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Phugewadi Liquor Case – फुगेवाडी भागातील संजयनगर परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या संपूर्ण अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,
अशी आक्रमक मागणी जगताप यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांची बैठक घेत या प्रकरणी तातडीने कडक पावले उचलावीत अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी फुगेवाडी येथील संजयनगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मृत सचिन नेटके, अक्षय अवसरमल, विजय राठोड, राजेंद्र राठोड , अकबर पठाण, आणि बाबा शेख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या कठीण काळात शासन आणि आम्ही सर्वजण मृतांच्या नातेवाइकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आगामी काळात या सर्व पीडित कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भागात कोणत्याही रुग्णाला अचानक त्रास झाल्यास त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय किंवा ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
रात्री ११ नंतर दुकाने बंद ठेवा; पोलिसांना कडक निर्देश
आमदार जगताप यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस निरीक्षक भीमराव कोळी उपस्थित होते परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फुगेवाडी परिसरात रात्री ११ नंतर सर्व दुकाने व टपऱ्या सक्तीने बंद ठेवण्यात याव्यात,
असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. तसेच रात्रीच्या वेळी तरुण मुले विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसांनी तात्काळ त्यांच्या पालकांना बोलावून याविषयीची माहिती द्यावी व योग्य ती समज द्यावी, अशा कडक सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.






