CM कार्यालयातून ‘भगतसिंग-आंबेडकर’ यांचे फोटो हटवले; आतिशी यांची भाजपवर टीका, विधानसभेतही गोंधळ

Delhi Election 2025 – संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या विधानसभेतील कार्यालयातून काढून टाकण्यात आले आहेत असा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. यातून भाजपचे दलितविरोधी राजकारण उघड होते आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारच्या काळात, प्रत्येक सरकारी कार्यालयात आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो लावण्यात आले होते. पण आज जेव्हा आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या विधानसभेतील कार्यालयात भेटायला गेलो तेव्हा आम्हाला दिसले की दोन्ही फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढून टाकण्यात आले आहेत, आम आदमी पक्ष याचा तीव्र विरोध करतो असे आतिशी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महात्मा गांधी यांचे फोटो आहेत असा दावा आपने केला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही फोटो हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, दिल्लीतील नवीन भाजप सरकारने बाबा साहेबांचा फोटो काढून टाकला आणि त्याऐवजी पंतप्रधान मोदींचा फोटो लावला हे बरोबर नाही. यामुळे बाबा साहेबांच्या कोट्यवधी अनुयायांना दु:ख झाले आहे. माझी भाजपला एक विनंती आहे. तुम्ही पंतप्रधानांचा फोटो लावू शकता पण बाबा साहेबांचा फोटो काढू नका.
या छायाचित्रांवरून दिल्ली विधानसभेतही मोठा गोंधळ झाला. नवीन सभापती विजेंद्र गुप्ता यांचे अभिनंदन करताना आतिशी म्हणाल्या की, छायाचित्रे काढून टाकणे अपमानास्पद आहे. यावर आपचे आमदारही गोंधळ घालताना दिसले. यावर सभापती विजेंद्र गुप्ता म्हणाले की, हे एक सौजन्यपूर्ण भाषण होते. राजकीय व्यासपीठ तयार करायला नको होते. मी आतिशींच्या वर्तनाचा तीव्र निषेध करतो.





