शरद पवार अन् बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण…”भाजपनेच राज ठाकरेंचा…”

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यासाठी महाराष्ट्रातून सूत्रे हलवली गेली, असा आरोप मनसेने केला आहे. मात्र मनसेने खासदार शरद पवार आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा 2018 सालचा फोटो व्हायरल करुन जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा राजकारणाशी काहीही संबध नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि बृजभूषण सिंह हेही भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत. कुस्ती स्पर्धेच्या आयोजनातला हा जुना फोटो आहे. फोटोच्या मागील बॅनरवर कुस्ती कार्यक्रमाचा स्पष्ट उल्लेख आहे. वास्तविक हा फोटो 2018 चा आहे आणि राज ठाकरे यांचा दौरा 2022 मध्ये रद्द झाला. 2018 चा फोटो आणि 2022 चा संदर्भ अशी शकल मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कशी जुळवली हा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्या फोटोचा राजकीय संबंध लावायचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. यावरून भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला हे स्पष्ट होते, असे महेश तपासे म्हणाले.
मनसेकडून केलेला आरोप हा बिनबुडाचा व चुकीचा आहे. मनसेला राजकारणात महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे निरर्थक विषयांवर बोलून ते जनतेचा वेळ वाया घालवत असतात. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवाद पसरविण्याचा आरोप सातत्याने केला आहे. यावेळी भोंग्यांचा विषय उचलून त्यांनी महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेने त्यांच्या या विषयाला फारसा प्रतिसाद दिला नाही, ज्यामुळे राज ठाकरे यांच्या हाती अपयश आले. असेही महेश तपासे म्हणाले.





